Builder Politician Nexus
I am completely opposed to Shiv Sena and MNS because of their ideologies. So that I can point people to the wrongdoings of these goons when the next elections come, I'm pasting the following article from Sakal verbatim.
The article is also accessible from the esakal site here.
UPDATE 1 - Another article exposing the Sena's true color
http://timesofindia.indiatimes.com/city/goa/Goa-Sena-chief-booked-for-extortion/articleshow/6291776.cms
पुणे - बालेवाडीमध्ये एकशे चार गुंठ्याचा भूखंड बळकविल्याच्या आरोपावरून प्रख्यात बांधकाम व्यावसायिक आर. के. आगरवाल, रवी सांकला, नगरसेवक राजेश पिल्ले व माजी नगरसेवक अजय भोसले यांना राज्य अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी सायंकाळी अटक केली. या चौघांच्या अटकेमुळे शहर व पिंपरी चिंचवडमधील राजकीय क्षेत्रात व बांधकाम व्यावसायिकांत खळबळ उडाली.
याप्रकरणी प्रदीपकुमार दोरजे (वय 55, रा. डीपी रोड, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल "ल मेरिडियन'चे संचालक रामकुमार ब्रह्मदत्त आगरवाल (वय 52, रा. ब्रह्मा पॅरेडाईज, मंगलदास रोड), बांधकाम व्यावसायिक रवींद्र नृपतलाल सांकला (वय 52, रा. ढोले-पाटील रस्ता), पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक राजेश गोविंदस्वामी पिल्ले (वय 43, रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी) व शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय जयवंतराव भोसले (वय 39, रा. नाना पेठ) यांना अटक झाली आहे. जमीन बळकावणे, अतिक्रमण करणे, अपहरण करणे, गुन्ह्याचा कट रचणे, दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे आदी आरोपांन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भोसलेने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. त्याच दरम्यान त्यांच्या मोटारीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. सुदैवाने तो बचावला होता. त्या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नाही. पिल्ले हा सराईत गुंड असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
'या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना शुक्रवारी शिवाजीनगर न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे,'' असे 'सीआयडी'चे प्रमुख व अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. पी. एस. यादव यांनी सांगितले.
'सीआयडी'चे अधीक्षक शरद शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार दोरजे यांची बालेवाडीमध्ये 104 गुंठे जमीन आहे. ती त्यांनी आसनानी या बांधकाम व्यावसायिकाला विकसित करण्यासाठी 2001 मध्ये दिली होती. त्याच्या बदल्यात 19 हजार चौरस फुटांवर बांधकाम व 14 लाख रुपये देण्याचा त्यांच्यात करार झाला होता. मात्र, या कराराबद्दल दोरजे व आसनानी यांच्यात पुढे मतभेद झाले. त्यामुळे आसनानी यांनी "कारिया बिल्डर्स'ला कराराची पूर्तता करण्यास सांगितले. मात्र, त्यांच्याकडून तो व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे कारिया बिल्डर्स यांनी 2006 मध्ये या व्यवहाराची सूत्रे आगरवाल व सांकला यांच्याकडे सोपविली. या दोघांनी पिल्ले, भोसले व त्यांच्या 25-30 साथीदारांच्या मदतीने 25 मार्च 2006 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दोरजे यांच्या भूखंडाचा ताबा घेतला. त्या वेळी दोरजे यांचे फलक फेकून देण्यात आले. तसेच त्यांच्या तीन रखवालदारांचे अपहरण करण्यात आले होते.
दोरजे यांनी त्या वेळी चतुःशृंगी पोलिसांकडे तक्रार केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यांनी पाठपुरावा केल्यावर 6 एप्रिल 2006 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास व्यवस्थित होत नसल्यामुळे दोरजे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात या गुन्ह्याचा तपास "सीबीआय' किंवा "सीआयडी'कडे सोपविण्याची त्यांनी मागणी केली. न्यायालयाने गुन्ह्याचा तपास 29 डिसेंबर 2006 रोजी "सीआयडी'कडे सोपविला. त्याविरोधात आगरवाल व सांकला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पुढे ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सुमारे पावणेदोन वर्षे त्यांनी पोलिसांच्या तपासावर स्थगिती मिळविली होती. 2008 मध्ये ही स्थगिती उठल्यावर "सीआयडी'ने तपास करून गुरुवारी कारवाई केली. ""या जमिनीच्या संदर्भात सुमारे 12 वेळा व्यवहार व करार झाले आहेत. आगरवाल व सांकला यांनी ही जमीन नंतर संजय बाफना व श्याम सोनवणे यांच्याकडे सोपविली होती. त्या सर्व व्यवहारांचा तपास सुरू आहे,'' असे अधीक्षक शेलार यांनी सांगितले. उपअधीक्षक नरेंद्र गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
गोपनीयता बाळगून कारवाई
आगरवाल, सांकला, भोसले व पिल्ले यांना "सीआयडी'ने संगम पूल येथील कार्यालयात यापूर्वी चार-पाच वेळा चौकशीसाठी बोलविले होते. तेव्हा ते आले होते. गुरुवारीही त्यांना नेहमीप्रमाणेच चौकशीसाठी सकाळी अकरा वाजता बोलविण्यात आले होते. ही चौकशी सुरू असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तेथून परतल्यावर त्यांना अटक झाल्याचे तपासाधिकारी व उपअधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी त्यांना सांगितले. अटकेचे वृत्त शहरात पसरताच बांधकाम व्यावसायिकांत प्रचंड खळबळ उडाली होती. आगरवाल यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने दोन वर्षांपूर्वी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करू नये, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला होता. ही बाब लक्षात घेऊन "सीआयडी'ने कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता चौघांवर अटकेची कारवाई केली.
आणखी तपासाची गरज
पुणे शहराच्या परिसरात जमिनीच्या किमती अस्मानाला भिडलेल्या असल्यामुळे दहशत दाखवून जमिनी बळकविण्याचे प्रकार वाढत आहेत. आगरवाल व सांकला यांच्यासारखे मोठे बांधकाम व्यावसायिकही त्याला अपवाद ठरलेले नाहीत, हेच या प्रकारातून सिद्ध झाले आहे. या दोन्ही बांधकाम व्यावसायिकांच्या सर्व व्यवहारांची महापालिका, पोलिस व महसूल खाते यांच्याकडून चौकशी करून त्यांनी अशा पद्धतीने आणखी काही गैरव्यवहार केले आहेत का, याचाही शोध घेतला जाण्याची गरज आहे. तसे झाले तरच सामान्य नागरिकांचा शासकीय यंत्रणांवरील विश्वास कायम राहील.